मंगेश काकडला अँक्टर व्याचय.

Spread the love

मंगेश काकडला अँक्टर व्याचय

नाशिकच्या मखमालाबाद गावात, एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला मंगेश काकड याचा बालपणाशी खेळण्यांचा नाही, तर वेदनांचा संबंध होता. खेळण्यांऐवजी वडिलांचा मार, आणि स्वप्नं पाहण्याआधीच परिस्थितीची चपराक—अशीच त्याच्या आयुष्याची सुरुवात झाली. शाळेत जायला छत्री किंवा रेनकोट नव्हता. पावसाळ्यात खताच्या रिकाम्या गोण्यांचं घोंगटं पांघरून तो शाळेत जायचा. घरात टीव्ही नव्हता, सोयी नव्हत्या… पण स्वप्नं मात्र आभाळाएवढी होती.

 

अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डेंना पाहून त्याच्या मनात अभिनयाचं बीज रुजलं. एक दिवस दहावीच्या वर्गात शिक्षकांनी विचारलं, “मोठे होऊन काय व्हायचंय?” कुणी डॉक्टर, कुणी इंजिनिअर, कुणी पायलट म्हणालं. मंगेश उभा राहिला आणि ठामपणे म्हणाला,

“मला ॲक्टर व्हायचंय… आणि एकदम ॲक्टरच व्हायचंय!”क्षणात अख्खा वर्ग हसला. शिक्षिकाही हसल्या. खेड्यातल्या, साध्या दिसणाऱ्या मुलाने हिरो होण्याचं स्वप्न पाहणं सगळ्यांना विनोद वाटलं. पण आज त्या वर्गात एकच माणूस आहे, जो आपल्या स्वप्नात जगतोय—तो म्हणजे मंगेश.

हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. इंजिनिअरिंग झालं, तरी अभिनयाची ओढ शांत बसू देईना. ऑडिशनच्या नावाखाली फसवणूक झाली. एकाने तर हिरो करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. वडिलांनी ठाम नकार दिला—“पैसे नाहीत. हिरो नाही झाला तरी चालेल, शेती करेल.”

 

यानंतर MPSC. रात्रंदिवस अभ्यास. पण नशिबाने पुन्हा थट्टा केली—अवघ्या एका मार्काने प्रीलीम हुकली. हातातली ३५ हजारांची नोकरी गेली, सरकारी नोकरीही नाही… दीड वर्ष बेरोजगारी आणि नैराश्य.आणि मग आला लॉकडाऊन. जग थांबलं, पण मंगेश थांबला नाही. महागडा फोन नव्हता. शूट करायला माणूस नव्हता. तरी त्याने घराच्या खिडकीच्या काचेत आपलं प्रतिबिंब पाहून कॅमेरा लावला. स्वतःच पोलीस, स्वतःच गुन्हेगार. कपडे बदलून पात्रं साकारली. तिथूनच ‘मंगू’, ‘चिनी’, ‘दाजी’, ‘जीजू’ जन्माला आले.

 

ज्यांनी कधी हसवलं होतं, तेच लोक आज त्याचे व्हिडिओ शेअर करू लागले. शून्यातून सुरू झालेला हा प्रवास आज लाखो मनांवर राज्य करतोय.पण या यशापेक्षा एक मेसेज त्याच्यासाठी फार मोठा ठरला. एका डॉक्टरने लिहिलं होतं.

“माझी पत्नी डॉक्टर होती. कोविडमुळे आयसीयूमध्ये शेवटच्या क्षणांत होती. त्या वेदनेतही ती तुझे रील पाहून हसायची. आज ती नाही… पण तुझे व्हिडिओ पाहताना मला तिचा तो हसणारा चेहरा आठवतो.”त्या क्षणी मंगेशला कळलं—तो फक्त विनोद करत नाही, तो कोणाच्या तरी आयुष्यात शेवटचा आनंद पेरतोय.शून्यातून विश्व उभारणारा हा कलाकार आज खरंच Unstoppable आहे.

Leave a Comment